भाजपा माझा पक्ष परंतु लालूप्रसाद यादव हे माझ्या कुटुंबीयांसारखे : शत्रुघ्न सिन्हा

पाटणा (बिहार ) : भाजपा माझा पक्ष आहे, पण राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रिमो लालूप्रसाद यादव हे माझ्या कुटुंबीयांसारखे आहे, असे मत खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी नोंदवले आहे. राजदचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत सहभागी झाल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यादरम्यान, शत्रुघ्न सिन्हा हे भाजपा सोडून राजदमध्ये सहभागी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

यावेळी शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, लालूप्रसाद यादव आणि राबडीदेवी, तेजप्रताप आणि मिसा भारती हे सर्वजण माझे कौटुंबिक मित्र आहेत. त्यांच्या आमंत्रणामुळेच मी इफ्तार पार्टीत सहभागी झालो आहे. भाजपा माझा पक्ष होऊ शकतो,परंतु, हे लोक माझे कुटुंबीय आहेत.

काही दिवसांपूर्वीच शत्रुघ्न सिन्हा हे राजदमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ते अनेकवेळा भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांवर टीका करताना दिसतात. लालूप्रसाद यादव हे आपले अत्यंत चांगले मित्र असल्याचे ते नेहमी म्हणतात. परंतु, आपण लालूंच्या पक्षाच्या जाण्याच्या चर्चा या निव्वळ अफवा असल्याचे सांगितले होते. मी भाजपातच राहणार असून पक्ष सोडून कुठेही जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.