भाजपाने कर्नाटकात लोकशाहीचा गळा घोटला – उद्धव ठाकरे

ठाणे : कर्नाटकात कुठल्याही परिस्थितीत सत्ता स्थापन करण्यासाठी लोकशाहीचा गळाघोटण्याचं काम भाजपाने केले आहे. असेच करायचे असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुका न घेता स्वत:च मुख्यमंत्री, राज्यपालांची निवड करून राज्य प्रस्थापित करावे, असा खोचक टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी लगावला. ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या सर्वच निवडणुका एकत्र घ्या. त्यासाठी आम्ही सज्ज आहोत. त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले. उल्हासनगरमधील गोल मैदान परिसरात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटनानंतर गोल मैदानातील जाहीर सभेत त्यांनी भाजपावर चांगलाच प्रहार केला.

यावेळी ते म्हणाले की, कर्नाटक, गोवा, मेघालय, बिहार आदी राज्यांत लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम भाजपातर्फे करण्यात आले. त्यांना कुठल्याही परिस्थितीत त्यांच्याच पक्षाचे सरकार स्थापन करायचे असेल, तर निवडणुकाच घेण्यात काहीही अर्थ नाही. तुमचा जाहिरात खर्च, भाषण, दौरे या सगळ्यांचा वेळ आणि पैसा हे दोन्ही वाचतील. मोदी विदेश दौरे करण्यासाठी मोकळे होतील. त्यांनी सरळ मुख्यमंत्री आणि राज्यपालांची निवड करून राज्य प्रस्थापित करावे. निवडणुका समोर आल्या, की मंदिर वहीं बनाऐं गेच्या घोषणा सुरू होतील. आता यांची सत्ता आहे. मग मंदिर बांधायला यांना कोणी रोखले आहे का? यांनी शेतकऱ्यांची दशा केली, जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेला खिंडार पडले. जकातीच्या उत्पन्नाचे स्त्रोत बंद करून पालिकांना रस्त्यावर आणले. अशी टीकाही त्यांनी केली.

मूठभरांच्या हितासाठी उल्हासनगरचा नवा शहर विकास आराखडा मंजूर झाला असून त्यामुळे तीन लाखांपेक्षा जास्त नागरिक बाधित होणार आहे. असा विनाशी विकास आराखडा रद्द केला जाईल, असे आश्वासन त्यांनी सभेत यावेळी दिले. तेथील व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवले जातील आणि प्रदूषणाच्या प्रश्नावर बंद पडलेले जीन्स कारखाने सुरू करण्याचे संकेतही त्यांनी दिले. उल्हासनगरातील शिवसैनिकांची प्रचंड गर्दी पाहून मला शिवसेनाप्रमुखांसारखे टॉनिक देऊन गेली. त्यामुळे मी तुम्ही आमंत्रित न करताही मी उल्हासनगरात येणार असल्याचे वचन ठाकरे यांनी यावेळी दिले.

उल्हासनगरच्या कामगार रूग्णालयाच्या जागी नवे रुग्णालय बांधण्यात येणार असून, त्यासाठी केंद्र व राज्य शासनाची मान्यता खासदार शिंदे यांनी आणल्याचे ठाकरे यांनी आवर्जून सांगितले. परवडणाऱ्या घरांच्या नावाखाली मुंबईतील मीठागरांच्या जमिनी घशात घालपण्याचा त्यांनी कडाडून विरोध केला. सत्तेत असूनही कायम जनतेच्या प्रश्नावर आंदोलन केल्याने शेतकरी, सामन्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यास भाजपाला भाग पाडल्याचा दाखलाही त्यांनी दिला.

यावेळी या सभेला पालकमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांगडे, आमदार बालाजी किणीकर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर सिंधी समाजासह इतर समाजातील संताना खास आमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्यात आला. एकनाथ शिंदे यांनीही आपल्या भाषणात उल्हासनगरच्या विकास आराखड्याला विरोध असल्याचे जाहीर केले. खासदार शिंदे यांचा कार्य अहवाल यावेळी प्रसिध्द झाला. तसेच त्यांचाय वेबसाईटचे उद्घघाटनही ठाकरे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.