सत्तेसाठी भाजपा ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणाचा वापर करू शकतात – कुमार केतकर

मुंबई : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असला तरी सत्ता स्थापन करण्यासाठी हवी ती संख्या भाजपाकडे नाही. त्यामुळे ‘कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपा ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणाचा अवलंब करून  काँग्रेस किंवा जेडीएसचे आमदार फोडू शकतात. तसे ते प्रयत्नही नक्कीच करतील.’ असं मत काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी व्यक्त केलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
‘काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर कर्नाटकमधे सत्ता स्थापन करण्यासाठी नेमके कुठले प्रयत्न सुरु आहे याबाबत मला अद्याप तरी फार काही माहित नाही. सर्वसाधारणपणे अशी पद्धत आहे की, जय पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असतील त्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले जाते. पण जर पर्यायी सरकार निर्माण होण्याची शक्यता असेल. तर राज्यपाल त्यांनाही आमंत्रित करतात. पण इथं पक्षपातीपणा होऊ शकतो. गोवा, मणिपूरमध्ये तसं झालं देखील. कर्नाटकमध्ये पर्यायी सरकार निर्माण होऊ शकतं. पण त्यासाठी राज्यपालांनी त्यांना संधी देणं गरजेचं आहे. मात्र, केंद्रात भाजपचं सरकार असल्याने इथंही भाजप जोरदार प्रयत्न करतील.’ असंही केतकर म्हणाले.
 हे सगळं कारस्थान २०१९ ला होणाऱ्या निवडणुकीसाठी सुरु आहे. जर या निवडणुकीत भाजपला ९० जागा मिळाल्या असत्या तर त्यांनी जेडीएससोबत युती करुन सत्ता स्थापन केली असती. त्यावेळस त्यांनी बॅकफूटवर जाऊन जेडीएसला मुख्यमंत्रीपद दिलं असतं. पण आता त्यांना अवघ्या काही जागा कमी पडत असल्यामुळे ते आता साम-दाम-दंड-भेद याचा वापर करु शकतात.’ असं केतकर यावेळी म्हणाले.
‘काँग्रेसने जेडीएसला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. काँग्रेसने अनेक वेळा दुय्यम स्थान स्वीकारुन स्थानिक पक्षाशी युती करत सत्ता स्थापन केल्या आहेत. स्थानिक राजकारण जाणून काँग्रेसने नेहमी आपली भूमिका ठरवली आहे.’ असंही केतकर म्हणाले. ‘गोव्यामध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष होता. पण त्यावेळी तिथे पक्षपातीपणा करण्यात आला. गेल्या चार वर्षात भाजपने तशी रितच केली आहे. अनेक राजकीय संकेत भाजपने पायदळी तुडवले आहेत. यापुढेही ते तुडवले जातील.’ असं म्हणत केतकर यांनी भाजपवर टीका केली.