भाजपाने फोडून दाखवलं! काँग्रेसचे १२, जेडीएसचे २ आमदार गायब

बंगळुरु : कर्नाटकात आमचीच सत्ता येणार हे भाजपाच्या वतीने छाती ठोकून सांगण्यात आले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक १०४ जागा मिळाल्या असल्या, तरी सत्ता स्थापन करण्यासाठी लागणारा ११३ चा आकडा मिळाला नसल्याने भाजपासमोर मोठे आवाहन उभे ठाकले आहे. आवाहन कितीही मोठे असले तरी भाजपाने सत्ता स्थापन करण्यासाठी रणनीती आखली होती. आणि ही रणनीती यशस्वी झाल्याची माहिती समोर येत आहे.

७८ जागांवर विजयी झालेल्या काँग्रेसनं काल ३७ उमेदवार निवडून आलेल्या जेडीएसला बिनाशर्त पाठिंबा दिला. त्यामुळे जेडीएसनं राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र भाजपाच्या नेतृत्वानं एका रात्रीत जेडीएस आणि काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या स्वप्नांना उधळून लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजपानं कर्नाटकात ‘गोवा पॅटर्न’ अंगिकारला आहे. त्यामुळे आज काँग्रेसच्या १२ नवनिर्वाचित आमदारांनी पक्षाच्या विधिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली आहे. तर जेडीएसचे दोन आमदार पक्षाच्या संपर्कात नसल्याची माहिती समोर येत आहे. भाजपाला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आठ आमदारांची आवश्यकता आहे आणि काँग्रेस-जेडीएसच्या ‘गायब’ झालेल्या आमदारांची एकूण संख्या १४ इतकी आहे. त्यामुळे भाजपा सत्ता स्थापन करण्याची दाट शक्यता आहे.

जेडीएसच्या नवनिर्वाचित आमदारांची आज पक्ष कार्यालयात बैठक होती. मात्र या बैठकीला राजा व्यंकटप्पा नायका आणि व्यंकटा राव नाडागौडा हे दोन आमदार गैरहजर राहिल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेनं दिलं आहे. काँग्रेसच्या आमदारांचीही आज पक्ष कार्यालयात बैठक घेण्यात आली. काँग्रेसचे ७८ उमेदवार निवडून आले आहेत. मात्र त्यापैकी ६६ आमदार बैठकीला हजर झाले आहेत. त्यामुळे १२ आमदार नेमके कुठे गायब झाले, याची चर्चा सुरू झाली आहे.

आज भाजपाच्या प्रदेश कार्यालायात निवडून आलेल्या पक्षाच्या आमदारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत बी.एस.येडियुरप्पा यांची भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी निवडदेखील करण्यात आली आहे. निवड झाल्यानंतर त्यांनी लगेचच राजभवन गाठून सत्ता स्थापनेचा दावा केला. काँग्रेस-जेडीएसचे आमदार त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या संपर्कात नसताना येडियुरप्पा यांनी आपण उद्या सत्ता स्थापन करू, असा दावा केला. त्यामुळे एका रात्रीत भाजपाच्या चाण्यकांनी आमदारांची जुळवाजुळव केली असल्याची माहिती पुढे येत आहे.