भय्युजींना तोंड बंद ठेवण्यासाठी दिली होती मंत्रिपदाची ऑफर : दिग्विजय सिंह

नवी दिल्ली: अध्यात्मिक गुरु भय्युजी महाराज यांच्या आत्महत्यनेनंतर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी त्यांच्यासंदर्भात एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. मध्य प्रदेशातील नर्मदा परिसरात अवैधरित्या सुरु असलेल्या खाणींविषयी भय्युजी महाराजांनी चिंता व्यक्त केली होती. त्यामुळेच सरकारने त्यांना राज्यमंत्रिपदाची ऑफर देऊ केली होती. परंतु त्यांनी ही ऑफर नाकारली. त्यांनी फोन करून मला हे सर्व सांगितले होते, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले.

आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीत त्यांनी आपण जीवनाला कंटाळल्याचे म्हटले होते. कोणीतरी कुटुंबाची जबाबदारी स्वीकारा. मी आता खचलोय. मी आता जात आहे, असे त्यांनी म्हटले होते. परंतु, माझ्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असेही त्यांनी चिठ्ठीत सांगितले होते.

दरम्यान, आज भय्युजी महाराजांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्याआधी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत सुर्योद्य आश्रमात भय्यू महाराज यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेता आले. दुपारी दीड वाजता त्यांच्या अंतिम यात्रेला सुरुवात झाली असून, अडीच वाजता इंदूरमधील मेघदूत मुक्तिधाम येथे अंत्यसंस्कार केले गेले राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक तसेच करमणूक क्षेत्रातील मंडळींचा भय्युजी महाराजांशी संबंध होता. त्यांचा सल्ला व आशीर्वाद घेण्यासाठी या क्षेत्रातील मंडळी नेहमी त्यांच्याकडे जात. मात्र, दोन महिन्यांपूर्वी त्यांनी अध्यात्म व सामाजिक कार्यातून निवृत्ती घेतली होती.