भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत आघाडी होणारच – प्रफुल्ल पटेल

गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी पक्षाशी फारकत घेत खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त असलेल्या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकी विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात दाखल जनहित याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर या क्षेत्राची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हि निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यात विशेष म्हणजे निवडणूक जाहीर झाल्यास ही निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस संयुक्त आघाडी करुन लढणार असल्याचे खा. प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

यावेळी पटेल म्हणाले की, भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राची जागा पूर्वीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात आहे. त्यामुळे त्यात जागावाटपाचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच निवडणूक आयोगाने येथील निवडणूक जाहीर केल्यास ती दोन्ही पक्ष आघाडी करुन लढवतील. मात्र यावर आत्तापासूनच तर्क विर्तक लावण्याची गरज नाही. भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राची पोटनिवडणूक झाल्यास आपण स्वत: ती लढविणार नाही हे आपण आधीच जाहीर केले आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर पक्ष उमेदवार ठरवेल. अद्यापही कोणत्याही उमेदवाराचे नाव ठरले नसल्याचे ते म्हणाले.

मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड राज्यात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होवू घातल्या आहे. या तिन्ही ठिकाणच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार आहे. आणि त्यादृष्टीने पक्षाचे काम सुरू आहे, असेही पटेल म्हणाले. उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या पोटनिवडणुकीत समाजवादी पाटी आणि बहुजन समाज पार्टीने एकत्र येऊन लढल्याने भाजपाच्या उमेदवाराचा दारुन पराभव झाला. त्यामुळे हाच
प्रयोग २०१९ च्या निवडणुकीत केल्यास चित्र वेगळ असू शकते. त्यादृष्टीने सर्व विरोधकांमध्ये वातावरण तयार होत असल्याचेही त्यांनी सांगितले.