बीड जिल्हा परिषदेच्या बिंदूनामावलीतील त्रृटी सहा महिन्यात दूर करणार – दादाजी भुसे

नागपूर : बीड जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांची बिंदूनामावली जिल्हा परिषदेमार्फत अद्ययावत करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या मागासवर्गीय कक्षाकडून मान्यता घेण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या बिंदूनामावलीतील त्रृटी सहा महिन्यात दूर करणार असल्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदोष बिंदूनामावलीबाबत अन्याय होत असल्याची लक्षवेधी सूचना सदस्य विनायक मेटे यांनी मांडली होती. लक्षवेधीला उत्तर देताना श्री.भुसे बोलत होते. ते म्हणाले, खुल्या प्रवर्गातून काही शिक्षकांनी बिंदूनामावलीबाबत आक्षेप उपस्थित केले होते. त्यानुसार बिंदूनामावलीची पुनर्तपासणी करण्यासाठी उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. समितीला आढळून आलेल्या त्रुटी दुरुस्त करुन पुन्हा बिंदूनामावली मान्यतेसाठी मागासवर्गीय कक्षाकडे पाठविण्यात येणार आहे. बिंदूनामावलीनुसार शिक्षकांच्या बदल्या होतात. मागासवर्गीय व सर्वसाधारण उमेदवारावरील अन्याय दूर करण्‍यासाठी बिंदूनामावली प्रवर्गनिहाय बदल्या होतील, असेही श्री. भुसे यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री नरेंद्र पाटील, ॲड. जयदेव गायकवाड यांनी सहभाग घेतला.