मोदींनी बँकिंग व्यवस्थेचा बट्ट्याबोळ केला – राहुल गांधी

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून परत एकदा देशात नोटाबंदीसारखी परिस्थिती निर्माण झाली विशेषतः बिहार, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील शहरांतल्या एटीएममध्ये रोख रकमेचा तुटवडा जाणवत आहे. त्यानंतर परत एकदा विरोधकांनी सरकारची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. या मुद्द्यावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नीरव मोदी भारतीय बँकांना तब्बल ३० हजार कोटीरुपयांचा चुना लावून देशाबाहेर पळाला. तर दुसरीकडे सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेऊन सामान्यांना अनेक दिवस रांगेत उभे राहायला लावले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत तोंडातून एकही शब्द बाहेर काढत नाहीत. त्यांनी भारतीय बँकिंग व्यवस्थेचा बट्ट्याबोळ केला आहे, अशी सणसणीत टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

यावेळी ते म्हणाले की, मोदींच्या काळात नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीसारख्या लोकांना ‘अच्छे दीना’ ची अनुभूती आली, तर जनता, शेतकरी व मजुरांना ‘बुरे दिन’ पहायला मिळाले. एरवी नरेंद्र मोदी संपूर्ण देशभरात भाषणं देत असतात. मात्र, पीएनबी घोटाळा व राफेलसारख्या विषयावर ते विरोधी पक्षांसमोर उभे राहण्याची हिंमत दाखवत नाही, अशी खरमरीत टीकाही त्यांनी मोदींवर केली.