कमला मिल कम्पाउंडच्या मालकांना जामीन

मुंबई : २९ डिसेंबर २०१७ रोजी मुंबईतील कमला मिल कम्पाउंडमधे घडलेल्या जळीत कांडाप्रकारणी कंपाउंडच्या मालकांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सध्या बंधिस्त असलेल्या कमला मिल कम्पाउंडच्या मालकांपैकी एक रमेश गोवानी आणि कमला मिल कम्पाउंडचे डायरेक्टर रवी भंडारी यांना अखेर उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुंबई उच्च न्यायालयाने या जामीन अर्जावरील सुनावणी तातडीनं पूर्ण केली. सुट्टीकालीन न्यायालयाचं कामकाज पाहणाऱ्या न्यायमूर्ती व्ही.एल. अचलिया यांनी मंगळवारी दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर आपला निर्णय बुधवारपर्यंत राखून ठेवला होता. त्यानंतर कालच्या सुनावणीत त्यांनी जामीन मंजूर केला.

कमला मिल जळीत कांडाप्रकारणी एमआरटीपी अंतर्गत कमला मिलचे मालक रमेश गोवानी यांना अटक करण्यात आली होती. एमआरटीपी कायद्याचे उल्लंघन करणे, बेकायदेशीर कामास मदत करणे, मृत्यूस कारणीभूत होणे अशा विविध कलमांखाली रमेश गोवानी आणि रवी भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र घडलेल्या दुर्घटनेशी आपला कुठल्याही प्रकारचा संबंध नसल्याचा दावा या दोघांनी आपल्या जामीन अर्जात केला होता. घटना घडली तेव्हा आपण तिथं प्रत्यक्ष उपस्थित नव्हतो. तिथल्या दैनंदिन कामकाजाशी आपला कुठलाही संबंध नाही. या दोन्ही जागा पाच वर्षांच्या भाडेत्त्वावर दिलेल्या आहेत. या जागेत सुरु असलेल्या पब्ज-रेस्टॉरंटसाठीचे सर्व परवाने हे पालिका प्रशासनाने दिलेले आहेत. मद्यसेवनाचे परवाने राज्य सरकारने दिलेले आहेत. अग्निसुरक्षा संबंधिचा परवानाही मुंबई अग्निशमन दलाच्या वतीनं देण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेशी आपला काहीही संबंध नाही, असा दावा गोवानी आणि भंडारी यांनी आपल्या अर्जात केला होता.