औरंगाबाद हिंसाचार : अग्निशमन चालकाला मारहाण, नेत्याने गाडीची चावी काढून घेतली

औरंगाबाद : येथे मध्यरात्री उसळलेल्या दंगलीदरम्यान शहागंज भागात आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला बंबशहागंज भागातील आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचा बंब गुलमंडीमार्गे येत असताना त्याला थांबविण्यात आले.

चालकाला राजकीय मंडळींकडून मारहाण करण्यात आली. अग्निशमन विभागाच्या वाहनाची किल्ली एका मोठ्या नेत्याने काढून घेतल्याची माहिती आहे. पोलीस या घटनेचेही पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करीत आहे. मनपा कर्मचाऱ्यांनी या घटनेची पोलिसांकडे तक्रार का केली नाही, यावरही पोलीस यंत्रणा आश्चर्य व्यक्त करीत आहे.

दरम्यान कंत्राटी पद्धतीवर अग्निशमन विभागात चालक म्हणून घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी वाहनावर जाण्यास चक्क नकार दिला. त्यांना त्वरित निलंबित करून दुसरे कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर घेण्याचे आदेश सोमवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले. शुक्रवारी मध्यरात्री दंगल उसळलेली असताना अग्निशमनच्या टँकरमधील पाणी संपल्यावर टँकरने पाणीपुरवठा झाला नाही. टँकर वेळेवर का पोहोचले नाहीत, याचाही खुलासा संबंधितांकडून मागविण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

अग्निशमन विभागात कंत्राटी चालकांनी अग्निशमनचे वाहन दंगलीत चालविण्यास नकार दिला. मनपाच्या एका टँकरचालकाला गुलमंडीवर मारहाण करण्यात आली होती. या घटनेमुळे इतर चालकांनी वाहन चालविण्यास नकार दिला होता.