आठवले -ढाले भेट : रिपाईंच्या राजकारणात नवी जळवाजुळव ?

मुंबई : आंबेडकरी चळवळीतील दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या भेटीमुळे रिपब्लिकन राजकारणात नवीन समीकरण जुळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या भेटीने दोन्ही नेत्यांमधील चाळीस वर्षांचा वाद संपुष्टात आला आहे. सोमवारी रामदास आठवले यांनी घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरमधील ढाले यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. ही भेट पूर्वनियोजित होती. या वेळी मुंबई रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष गौतम सोनावणे, काकासाहेब खंबाळकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी राजा ढाले यांच्याकडूनच राजकारणाचे धडे गिरवले आहे. ढाले यांच्यामुळे आठवले दलित पँथरमध्ये सहभागी झाले. परंतु पुढे नामदेव ढसाळ व ढाले या दोन प्रमुख नेत्यांमधील नेतृत्वाचा वाद शिगेला पोहचला, पँथरमध्ये फूट पडली. त्यानंतर रामदास आठवले राजा ढाले यांच्यासोबत राहिले. पुढे ढाले यांनी दलित पँथर संघटना बरखास्त केली, त्याला आठवले यांनी विरोध केला आणि भारतीय दलित पँथर नावाने ही संघटना सुरू ठेवली. त्यामुळे ढाले आणि आठवले यांच्यात दरी निर्माण झाली. मधल्या काळात दोन वेळा रिपब्लिकन ऐक्याच्या निमित्ताने सर्व दलित नेते एकत्र आले होते, परंतु ढाले व आठवले यांचे कधीच मनोमीलन झाले नाही.

मात्र या भेटीनंतर आठवले यांनी पत्रक प्रसिद्ध करून आपल्या भावना व्यक्त केल्या. राजा ढाले यांच्यामुळेच मी दलित पँथरमध्ये आलो आणि नेता झालो, अशी कबुली आठवले यांनी दिली. तर राजकारणात कोणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो, आपण सगळे आंबेडकरवादी एकच आहोत, संधीसाधूंना चळवळीतून हद्दपार केले पाहिजे, असे मनोगत ढाले यांनी व्यक्त केले. ढाले-आठवले भेटीने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे पत्रकात म्हटले आहे.