‘आर्य’ भारतात आले नव्हते!

- राखीगढीमधील जीवाश्मांच्या 'डीएनए' चाचणीचा निष्कर्ष

पुणे : ‘आर्य’ नावाच्या वंशाचे कुणीही प्राचीन भारतावर आक्रमण करून आले नव्हते आणि त्यांनी येथील मूळ निवासी लोकांना हुसकावूनही लावले नव्हते, यावर शिक्कामोर्तब करणारे महत्त्वाचे संशोधन उजेडात आले आहे. हरियाणातील राखीगढी येथे गेली चार वर्षे सुरू असलेल्या पुरातत्व उत्खननातून याचे पुरावे मिळाले आहेत.

इसवीसनपूर्व काळात भारतात अस्तित्वात असलेल्या सिंधू संस्कृतीवर मध्य आशियातून आलेल्या ‘आर्यां’नी आक्रमण केले आणि ही संस्कृती संपवली, अशा आशयाचे ‘सैद्धांतिक गृहितक’ गेली अनेक वर्षे मानणारे अनेक लोक देशात आहेत. या गृहितकास अनेक इतिहास अभ्यासक आणि विद्वानांनी उचलूनही धरले.

मात्र हा इतिहास खोटा आहे, इंग्रजांनी उत्तर आणि दक्षिण भारतीयांमधे फूट पाडण्यासाठी पसरवलेला गैरसमज आहे असा दावा करणाराही एक मोठा वर्ग आहे; राखीगढी येथील संशोधनाने या दाव्याला खरेठरवले आहे.

याबाबत एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटले आहे की उत्खननातून मिळालेल्या प्राचीन मानवी जीवाश्मांच्या ‘डीएनए’चा विशेष अभ्यास करण्यात आला असून, त्या आधारे ‘या भागात मध्य आशियातून परकीय मानवी आक्रमण झाल्याचे कसलेही ठोस पुरावे आढळून येत नाहीत,’ हे सिद्ध झाले आहे. जैवसंशोधनातील ‘डीएनए’ हा एक महत्त्वाचा आधार निकष म्हणून पुढ्यात ठेवण्यात आला होता. त्याच संशोधनातून पुढे आलेल्या निष्कर्षांतून ‘आर्यांचे आक्रमण’ खोटे ठरविले आहे; शिवाय तत्कालिन मानवी सांगाड्यांचा अभ्यास करताना जनुकीय संशोधनाच्या आधारे भारतातील वैदिक संस्कृतीचा विकासही येथील लोकांकडूनच झाल्याचे यामुळे सिद्ध झाले आहे.

डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे उत्खनन आणि संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनाबाबतचा सविस्तर अहवाल अद्याप जाहीर करण्यात आला नसून, त्यातील काही तांत्रिक बाबींची पूर्तता होणे बाकी आहे. लवकरच तो प्रकाशित करण्यात येईल. याविषयी बोलताना डॉ. शिंदे म्हणाले, ‘आर्य लोक कोण, ते भारतात कुठून आले हा वादग्रस्त मुद्दा ब्रिटीश भारतात सोडून गेले. मात्र, ते गेल्यावरही आपल्याकडे त्या संदर्भात अनेक वाद आणि मतभेद राहिले आहेत. यावर अचूक उत्तर केवळ विज्ञानाच्या आधारेच निघू शकेल, असे लक्षात आल्यावर आम्ही ‘राखीगढी’चे उत्खनन करण्याचा निश्चय केला. या उत्खननातून आम्हाला जे मानवी ‘डीएनए’ मिळाले आहेत, त्यांच्या संशोधनातून ते डीएनए मूळ भारतीय लोकांचेच असून, बाहेरून आलेल्या लोकांचे नाहीत, हे सिद्ध झाले आहे. यावरून आर्यांचे येथे येणे, हा प्रवाद खोडला जातो.’

राखीगढी येथील वसाहतीचा आणि तेथील संस्कृतीचा विकास कसा होत गेला, बदलत्या गरजांनुसार या शहरातील लोकांचे स्थलांतर कसे झाले, त्यांचा इतर वसाहतींशी विविध व्यवहारांत कसा संबंध येत गेला, त्यातून तेथे सांस्कृतिक विविधता कशी निर्माण होत गेली असा अनेकांगांनी अभ्यास या संशोधनातून करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

असा तपासला ‘डीएनए’
आजवरच्या अनेक उत्खननात तत्कालिन लोकांचा डीएनए मिळाला नव्हता. त्यामुळे जुन्या लोकांच्या अस्तित्वाविषयी रोखठोक वैज्ञानिक पुरावे गोळा करणे शक्य झाले नव्हते. या वेळी मात्र हे घडले. राखीगढीतील संशोधनात मानवी सांगाड्यांचा डीएनए सापडला, त्यावर अचूक संशोधनही करता आले. त्यासाठी कोरियन शास्त्रज्ञांची मदत झाली. सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वीचा डीएनए मिळवून त्यावरून अचूक माहिती मिळवणे, हे मोठे यश मानले जात आहे.

‘हार्वर्ड’ही होणार सहभागी
हे संशोधन जगन्मान्य अशा ‘नेचर’ मासिकात प्रकाशित केले जाण्याचे प्रयत्न सुरू आहेत; शिवाय या संशोधनाची अजून एकदा खात्रीशीर पडताळणी केली जावी, यासाठी हार्वर्ड विद्यापीठात उपलब्ध असणाऱ्या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाची मदतही घेतली जाणार आहे.