भरतपूर अभयारण्यात १९ हजारांहून अधिक देशी-विदेशी पक्षांचा गोतावळा, पक्षिगणनेत नोंद !

नाशिक: गुलाबी थंडीची चाहूल लागताच देशी-विदेशी स्थलांतरीत पक्ष्यांच्या किलबिलाटाने राज्याचे ‘भरतपूर’ म्हणून नावलौकिक मिळविणारे नांदूरमधमेश्वर (चापडगाव) पक्षी अभयारण्य गजबजण्यास सुरूवात होते. या पाश्वर्भूमीवर वनखात्याच्या वन्यजीव विभागाकडून मंगळवारी (दि.३१) पक्षी गणना करण्यात आली. विविध जातीचे देशी-विदेशी अशा १९ हजार ५२६ पक्ष्यांची नोंद यावेळी पक्षीनिरिक्षकांकडून नोंदविण्यात आली. एकूणच ‘भरतपूर’च्या हिवाळी संमेलनाला सुरूवात झाली असून अभयारण्याचा परिसरात विविध पक्ष्यांचा किलबिलाट कानी पडू लागला आहे.

वनविभाागच्या वन्यजीव खात्याच्या नियंत्रणात असलेल्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधार्‍याच्या बॅकवॉटरला चापगाव शिवारात पक्षी अभयारण्य विकसीत करण्यात आले आहे. राष्ट्रीय पक्षी अभयारण्याचा दर्जा प्राप्त असलेले हे अभयारण्य जांभळ्या पाणकोंबडीसह राखी बगळा (ग्रे-हेरॉन), जांभळा बगळा (पर्पल हेरॉन), मोठा रोहित (फ्लेमिंगो), कॉमन क्रेन (करकोचा), रंगीत करकोचा (पेंटेड स्टॉर्क ), मार्श हॅरियर यांसह बदकाचे विविध जातींसाठी प्रसिध्द आहे. दरवर्षी हिवाळ्यामध्ये या ठिकाणी मोठ्या संख्येने पक्ष्यांचे आगमन झालेले पहावयास मिळते. हिवाळ्याचा हा हंगाम पक्षीप्रेमींसाठी पर्वणीकाळ ठरतो.

थंडीची सुरूवात होताच अभयारण्य पक्ष्यांनी गजबजू लागले आहेत. मंगळवारी सहाय्यक वनसंरक्षक भरत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान ढाकरे, परिमंडळ अधिकारी पी.के.आगळे, प्रा. आर.बी. पाटील यांच्यासह निफाडचे जेष्ठ पक्षीमित्र दत्ता उगावकर, वनविभागाने नियुक्त केलेले गाईड अमोल दराडे, गंगाधर आघाव, प्रमोद दराडे, शंकर लोखंडे, अमोल डोंगरे आदिंनी अभयारण्य परिसरातील विविध निरिक्षण मनोर्‍यावर दिवसभर ठिय्या देऊन पक्ष्यांचे निरिक्षण करत अधिकृत आकडा नोंदविला. दरम्यान, राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पक्षीनिरिक्षकांची पावले ‘भरतपूर’कडे वळण्यास सुरूवात झाली आहे. वीकेण्डला पर्यटकांसह पक्षीप्रेमींची येथे गर्दी लागली आहे.