बनावट नोटा बनविणाऱ्या टोळीला अटक; ५६ लाखांच्या बनावट नोटा जप्त

सातारा : मोदी सरकारने नोटाबंदी केल्यानंतर आतापर्यंत देशातील अनेक ठिकाणी बनावट नोटांचा सर्रास वापर होत असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये झळकताना दिसत आहे. त्यातच साताऱ्यात एका अपार्टमेंटमध्ये चलनातील पाचशे व दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा बनवून त्या बाजारपेठमध्ये चालविणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेनेताब्यात घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ५६ लाख ४२ हजार रुपयांच्या बनावट नोटा व १ लाख ३३ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पोलिसांनी गणेश भोंडे (वय २५, रा. मोळाचा ओढा, सातारा), अनिकेत प्रमोद यादव (२२, रा. नवीन एमआयडीसी), अमोल अर्जुन शिंदे (२४, रा. गडकर आळी), सुनील देसू राठोड (२७, रा. मतकर कॉलनी), अमेल राजेंद्र बेलकर (२३, रा. पेंडसेनगर, मोळाचा ओढा) व राहुल अर्जुन पवार (२८, रा. शाहूपुरी) या आरोपीना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या पथकाने कोटेश्वर मंदिर परिसरात दुचाकीवर फिरून पाचशे व दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा चालविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पाचशे रुपयांच्या २१ व दोन हजार रुपयांच्या ७ नोटा जप्त केल्या. अनिकेत यादव व अमोल शिंदे या दोघांनी या नोटा गणेश भोंडवे याने बाजारात चालविण्यासाठी दिल्याची कबुली दिली.

त्यानंतर गणेश भोंडवे याच्या शाहूपुरीतील राहत्या घराची झडती घेतली असता दोन हजार रुपयांच्या १ हजार ३१५ नोटा व एका बाजूस महात्मा गांधींचा फोटो असलेली बाजू छापलेली व दुसरी बाजू कोरी असलेली ए-४ आकारचे ४९७ कागदं मिळून आले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता बनावट नोटा त्याला सुनील राठोड, अमेय राजेंद्र बेलकर, राहुल पवार यांनी बाजारात चालविण्याकरिता दिल्या आहेत. त्यानंतर या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २६ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा व २९ लाख ८८ हजार रुपयांच्या अर्धवट तयार केलेल्या नोटा असा एकूण ५६ हजार ४२ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा व १ लाख ३३ हजार ५०० रुपये किमतीचे वाहने व मोबाईल हँडसेट जप्त केले. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरु आहे.