सैन्य दलाच्या मदतीने बांधण्यात येणार एल्फिन्स्टनचा पूल

Bridge Construction Work

मुंबई: एल्फिन्स्टन रोड, दादरसारख्या मुंबईतील गर्दीच्या स्टेशनांवर वेगाने पादचारी पूल बांधले जावेत, यासाठी आता लष्कराचे अभियंते रेल्वे प्रशासनाला मदत करणार आहेत. एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेला काल एक महिना पूर्ण झाला आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी याबाबत रेल्वे आणि संरक्षण मंत्रालयाशी संपर्क साधला होता. त्याला दोन्ही विभागांनी हिरवा कंदील दाखवला आहे.

एलफिन्स्टन इथल्या पुलावर २९ सप्टेंबर रोजी चेंगराचेंगरी होऊन २३ निष्पाप जीवांचा बळी गेला होता. या दुर्घटनेला एक महिना पूर्ण झाला असून या परिसराची सध्याची परिस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी देशाच्या संरक्षणमंत्री, रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. या दौऱ्यासाठी सकाळी ६ वाजल्यापासूनच कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. या पुलाला लागून असलेल्या चाळीत राहणारे नागरीक पार्कींगची जागा नसल्याने निमुळत्या रस्त्यावर पार्कींग करतात, या दुचाकी हटवा अशा पोलीस मेगाफोनवरून सूचना देत होते.

आपत्कालीन परिस्थितीत युद्धपातळीवर पूल बांधण्याचं प्रशिक्षण मिलिटरी इंजिनीअरिंग विंगला दिलेलं असतं. राष्ट्रकुल स्पर्धेवेळी दिल्लीतील पूल पडला होता, तेव्हा या पथकानं तो झटपट बांधला होता. त्यासोबतच, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत आणि बचावकार्यातही त्यांनी झटपट पूल बांधून अडकलेल्यांची सुटका केल्याची अनेक उदाहरणं आहेत. ती लक्षात घेऊनच, एल्फिन्स्टन, दादर, बोरीवली, मुलुंड, ठाणे या स्टेशनांवर वेगानं पूल बांधण्यासाठी लष्कराने पुढाकार घ्यावा, असं आवाहन आशीष शेलार यांनी केलं होतं. त्यांनी संरक्षणमंत्री निर्मला सितारामन आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन त्यांना तशी विनंतीच केली होती. या दोघांनीही आपली सूचना मान्य केल्याचं ट्विट आशीष शेलार यांनी केली.

त्यानुसार, रेल्वे प्रशासनानं पुलाची जागा निश्चित केल्यानंतर, लष्कराचे अभियंते पुलाचा आराखडा तयार करून देतील आणि पुढे प्रत्यक्ष बांधकामातही सर्वतोपरी सहकार्य करतील. भारतीय लष्कराच्या क्षमतेवर कुणालाच शंका नाही. त्यामुळे रेल्वे पुलाच्या कामात त्यांचा झालेला सहभाग हा मुंबईकरांसाठी निश्चितच दिलासादायक आहे.