संतप्त शेतकऱ्यांनी मंत्रालयासमोर फेकला भाजीपाला

मुंबई : शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याच आश्वासन सतत केंद्र तसेच राज्य सरकारकडून देण्यात येत आहे. मात्र आजही धान्य किंवा भाजीपाल्याला योग्य हमीभाव मिळत नसल्याने धाराशीवच्या संतप्त शेतकऱ्यांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर भाजीपाला फेकून सरकारचा निषेध केला. एकीकडे बाजारात योग्य भाव मिळत नाही तर दुसरीकडे पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे पाठपुरावा करूनही शेतातला माल थेट मुंबईत विकायला जागा उपलब्ध झालेली नाही असा संताप या शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.

मंत्रालयाच्या मुख्य प्रवेद्वारासमोर काल सायंकाळी ५ च्या सुमारास अचानक एक भाजीपाल्याचा टेम्पो उभा राहिला. गेटवरील पोलिसांना कळायच्या आत या टेम्पोतील शेतकऱ्यांनी भाजी थेट मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर फेकण्यास सुरुवात केली. सुमारे १५ मिनिटे हा गोंधळ सुरू होता. त्यानंतर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

यावेळी शेतकऱ्यांनी सांगितलं की, परप्रांतीय फुटपाथवर भाजी विक्री करू शकतात, पण महाराष्ट्रातला शेतकरी नाही. आम्ही धाराशीवचे शेतकरी असून आमच्या भाजीपाल्याला बाजारभाव मिळत नाही म्हणून पणन मंत्रालयाच्या आठवडा बाजार योजनेतून आम्ही कांदिवलीत हा बाजार सुरू केला. मात्र तेथील महापालिका अधिकारी आम्हाला तिथे बसू देत नाहीत. तेथील फुटपाथवर परप्रांतीय भय्ये बसू शकतात, पण महाराष्ट्रातला शेतकरी बसू शकत नाही. आमचा माल जप्त झाल्याने आमचे लाखोंचे नुकसान झाले आहे. पणनमंत्र्यांकडे पाठपुरावा करूनही त्यांना आमच्याशी काहीही घेणेदेणे नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.