‘आंबा’ प्रकरणी नाशिक महापालिका संभाजी भिडेंवर खटला चालवणार

नाशिक : शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्या माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते असं अजब वक्तव्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे .

प्रसूतीपूर्व लिंग निदान तंत्र अधिनियम समिती पीसीपीएनडीटीच्या प्राथमिक बैठकीत संभाजी भिडे दोषी आढळले होते. त्यामुळे पीसीपीएनडीटीच्या निर्देशानुसार नाशिक महापालिकेने गर्भधारणा व प्रसूती पूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) या कायद्यातील कलम २२ अंतर्गत भिडे यांना दोषी ठरवून त्यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

जून महिन्यात नाशिकमधील एका सभेत बोलताना संभाजी भिडे यांनी आपल्या शेतातील आंबे खाल्ल्याने जवळपास १५० जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावाही केला होता. “लग्न होऊन १५ वर्ष झालेल्यांनाही मुलं होतं नाहीत. अशा स्त्री, पुरुषांनी ही फळं खाल्ल्यास त्यांना निश्चित मुलं होतील. मी आतापर्यंत १८० हून जास्त जणांना, जोडप्यांना हे फळ खायला दिलं असून १५० पेक्षा जास्त जणांना मुलं झाली आहेत”, असं विधान संभाजी भिडे यांनी केलं होतं. विशेष म्हणजे ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल असाही दावा त्यांनी केला होता.

महापालिकेने भिडे यांना दोनवेळा नोटीस बजावली होती. त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली होती पण त्यावर भिडे यांच्याकडून काहीच उत्तर आले नाही. त्यामुळे शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत भिडे यांनी कायद्याचे उल्लंघन केल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध होत असल्याने त्यांच्या विरुद्ध न्यायालयात खटला चालवण्याच निर्णय घेण्यात आला.