आघाडीचा निर्णय दोन्ही पक्षातील पक्षश्रेष्ठी घेतील – जयंत पाटील

सांगली : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा निर्णय दोन्ही पक्षाचे पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील यांनी दोन पावले माघार घेतली आहे. श्यामनगर येथे विविध विकासकामांचे उद्घाटन व आरक्षणबाधित रहिवाशांना एनए प्रमाणपत्राचे वाटप जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.

यावेळी पाटील म्हणाले की, महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी करण्याबाबत अद्यापपर्यंत कुठलीही चर्चा झाली नसली तरी या बाबत दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेतेच निर्णय घेतील. सध्या भाजपला महापालिका सत्तेची स्वप्ने पडू लागली असली तरी सामान्य माणूस भाजप शासनाच्या कारभाराला वैतागला आहे. याचे पडसाद या निवडणुकीच्या निमित्ताने दिसून पडतील असेही पाटील यावेळी म्हणाले.

सध्या देशात महागाईने आपला उच्चांक गाठला आहे. पूर्वी भाजपचे नेते मोर्चे काढत होते, पण आता पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ झाली. त्यानंतर मोर्चे काढणारे भाजपचे नेते कुठे गेले, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. भाजपने निवडणुकीपूर्वी धनगर, मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते, पण त्यांना याचा विसर पडला. सामाजिक प्रश्नावर त्यांना उत्तर देता येत नाही. जनतेची फसवणूक सुरू आहे. त्यांच्या कारभाराचा आम्ही पर्दाफाश करू. असेही ते म्हणाले.

Facebook Comments