संजय निरुपम यांनी मनसेवर केला हफ्तेखोरीच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप

मुंबई : फेरीवाल्यांना भडकावल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय निरुपम यांनी हप्तेवसुली करणाऱ्या रॅकेटमध्ये मनसेचे नेतेही सहभागी असल्याचा आरोप केला. याचबरोबर, मुंबईत जेथे फेरीवाले कमकुवत असतील तेथे मनसेची दादागिरी चालेल. मात्र, ज्या ठिकाणी फेरीवाले वरचढ असतील तेथे मनसेला मार खावाच लागेल असा इशारा संजय निरुपम यांनी दिला आहे.

मनसेने मुंबईतील फेरीवाल्यांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेमुळे मनसेचे नेते आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यात वाद सुरु झाला आहे. निरुपम यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यांनतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, “फेरिवाले ही जागतिक समस्या आहे. जगातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी मी फेरिवाल्यांना पाहिले आहे. ही फक्त मुंबईतच आहे असे नाही. त्यामुळे नागरिकांनी फेरिवाल्यांऐवजी ही समस्या वाढवणाऱ्या पालिका प्रशासनावर टीका करावी. फेरीवाल्यांच्या प्रश्नांसंदर्भात मी गेली अनेक वर्षे संबंधितांशी चर्चा करत आहे. या फेरीवाल्यांना परवाने देण्याची मागणी करत आहे. पण या संदर्भात कोणीच काहीच करण्यात उत्सुक नाही. कारण या सगळ्या रॅकेटमध्ये हप्तेखोरी आहे. ज्यामध्ये मनसेचे नेतेही सहभागी आहेत.”

दरम्यान, मालाड पोलीस ठाण्यात काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपमांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मालाडमध्ये फेरीवाल्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचं काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी समर्थन केले.विनापरवानगी सभा घेऊन भाषण केल्यानिमित्त संजय निरुपमांविरोधात मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच संजय निरुपमांनी फेरीवाल्यांना भडकावल्यामुळे हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.