रविवारपासून सोमनाथमध्ये संघाची अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक

बडोदा: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अ. भा. प्रांत प्रचारक बैठक गुजरातच्या गिर-सोमनाथ जिल्ह्यातील सोमनाथ शहरात आयोजित करण्यात आली असून सरसंघचालक सोमनाथमध्ये दाखल होत आहेत. ही बैठक तीन दिवस म्हणजेच १५ ते १७ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सहभागी होण्याकरिता सरसंघालाक डॉ. मोहनजी भागवत गुरुवारी सोमनाथ येथे दाखल झाले आहेत. सरसंघचालकांना गिर-सोमनाथ जिल्ह्यात सहा दिवस मुक्काम राहणार आहे, अशी माहिती संघांचे गुजरात प्रांत प्रचार प्रमुख विजय ठाकूर यांनी आज दिली.

सोमनाथ येथे आल्यानंतर सरसंघचालकांनी देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रसिद्ध सोमनाथ मंदिराचे दर्शन घेतले. येथे त्यांचे स्वागत माजी मुख्यमंत्री आणि सोमनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशूभाई पटेल यांनी केले. मंदिरात पूजा केल्यानंतर मोहनजी भागवत यांनी मंदिराच्या परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली. सरसंघचालक भागवत यांचे काल दिवसभर अतिशय व्यस्त कार्यक्रम होते. तसेच संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशी हे देखील रात्री उशिरापर्यंत सोमनाथमध्ये पोहोचले असल्याची माहिती विजय ठाकूर यांनी दिली.