मुंबईसह कोकणात दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : मागच्या तीन दिवसांपासून मान्सूनच्या पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र शुक्रवारी पुन्हा जोरदार बरसून मुंबईकरांना आपले अस्तित्व दाखवून दिले. मात्र,आज आणि उद्या मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही अतिवृष्टी होईल, असा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. तर मुंबईत दुपारी १ वाजून १ मिनिटांनी ५ मिटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याच समजतयं. या मोसमातील ही सर्वात मोठी हाय टाईड आहे तरी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पश्चिम बंगालच्या वायव्येकडे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाले आहे. त्याचबरोबर गुजरातवरील चक्रीय वातस्थिती आणि रायपूरजवळील चक्रीय वातस्थिती कायम आहे. त्यामुळे रविवारपासून पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी स्पष्ट केले. सध्याच्या परिस्थितीनुसार उद्याही मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.