अजित पवारांचा मुलगा पार्थ राजकारणात येणार ?

पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ याची पावले आता राजकारणाकडे वळू लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत पार पडलेल्या विविध कार्यक्रमांना पार्थ हा आपल्या आजोबासह दिसून आला. त्यामुळे पार्थ पण राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती चे संस्थापक चेअरमन डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या 18 व्या स्मृती दिनाचे औचित्य साधून पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार प्रयोगशील शेतकरी पुरस्काराचे वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवारांनी एका हॉस्पिटलच्या उद्घाटनाला हजेरी लावली. तेथे तर पार्थने पवारांसोबत व्यासपीठावर उपस्थिती लावली. या कार्यक्रमासह पार्थ शरद पवार यांच्यासमवेत गाडीत दिवसभरत होता. त्यामुळे पार्थ राजकारणात सक्रिय होणार असे अंदाज बांधले जाऊ लागले आहेत.

मात्र, आपल्या मुलांनी राजकारणात येऊ नये असे पिता अजित पवारांनी वेळोवेळी म्हटले आहे. तरीही त्यांना ज्या क्षेत्रात रस असेल त्यात त्यांनी काम करावे मग ते उद्योग क्षेत्र असो की राजकारण. पण मी त्याला राजकारणात ये असे सांगणार नाही असे अजित पवारांनी म्हटले होते. त्यामुळे पार्थ राजकारणात येणार की नाही याची चर्चा कायम होत असते.

अजित पवारांचा पुतण्या रोहित पवार आता सक्रिय राजकारणात आला आहे. जो पक्षाचा बारामतीतून जिल्हा परिषद सदस्य आहे. त्यामुळे पवारांच्या तिस-या पिढीतील राजकारणी सदस्य म्हणून रोहितकडे पाहिले जात आहे. त्यातच आता पार्थची उपस्थिती त्याला राजकारणाकडे खेचणार का याकडे लक्ष आहे.

पार्थ हा आपले वडिल अजित पवारांसारखाच दिसतो. त्याचं बोलणं- चालणं अगदीच अजितदादांसारखे असल्याने तरूणांत त्याची क्रेझ आहे. आता त्याची बारामतीतील विविध कार्यक्रमांना उपस्थिती दिसू लागल्याने चुलत भाऊ रोहितसमवेत तो पण राजकारणात दिसतो का ते लवकरच कळू शकेल.