स्वतः सरण रचून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

यवतमाळ : राज्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरुच आहे. त्यातच यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण अधिकच वाढत असून, गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला एका शेतकऱ्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली होती. हे प्रकरण अजूनही ताजे असतांना यवतमाळ जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका वृद्ध शेतकऱ्यानं स्वत: ची चिता रचून आत्महत्या केली आहे. उमरखेड तालुक्यामधील सावळेश्वर येथील वृद्ध शेतकऱ्याने शनिवारी शेतातील पऱ्हाटीची चिता पेटवून त्यात स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. शनिवारी घडलेली ही घटना काल उघडकीस आली आहे. माधव शंकर रावते (वय७१) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

सावळेश्वर हे गाव दुर्गम भागात असल्याने दोन दिवसांपूर्वी घडलेली ही घटना सोमवारी उघडकीस येताच शासकीय यंत्रणा खळबळून जागी झाली. माधव रावते यांच्याकडे चार एकर कोरडवाहू शेती आहे. सततच्या नापिकीमुळे ते निराश होते. यावर्षी बोंडअळीमुळे त्यांना केवळ तीन क्विंटल कापसाचं उत्पादन घेता आले होते. त्यामुळे ते आर्थिक संकटात सापडले होते. त्यांच्यावर स्टेट बँकेचे ६० हजारांचे कर्ज असल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या चिंतेत भरच पडली होती.

शनिवारी ते शेतात गेले होते कापूस वेचून पऱ्हाटीचे ढीग शेतात लावून ठेवले होते. शनिवारी त्याच पऱ्हाटीची चिता पेटवून त्यांनी स्वतःला त्यात झोकून दिले. त्यांच्या शेतातून पऱ्हाटीचा ढीग पेटत असल्याचे दिसताच गावकऱ्यांनी त्यांचा मुलगा गंगाधर याला त्याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच गंगाधर व गावकरी शेतात धावत गेले. तोपर्यंत पऱ्हाटीच्या ढिगासह माधव रावते हेही त्यात संपूर्णपणे जळल्याचे दिसून आले.

Facebook Comments