तब्बल अडीच वर्षानंतर छगन भुजबळ स्वगृही येणार

नाशिक : महाराष्ट्र सदन घोटाळ्यात तब्बल चोवीस महिने कारागृहात बंधिस्त राहिल्यानंतर राष्टवादीचे नेते आणि माजी पालकमंत्री छगन भुजबळ हे नुकताच बाहेर आले आहे. त्यानंतर तब्बल अडीच वर्षांनंतर आता नाशिकमध्ये म्हणजेच आपल्या स्वगृही परतणार आहेत. आज गुरुवारी त्यांचे आगमन होणार असून, कार्यकर्त्यांनी स्वागताची जय्यत तयारी केली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने त्यांना ताब्यात घेतले होते.

१० जून रोजी संपन्न झालेल्या राष्टवादी कॉँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यात घणाघाती भाषण करून राजकारणातील कमबॅक केले होते. आता ते आजापासून नाशिकमध्ये येणार असून, दुपारी १२ वाजता पाथर्डी फाटा येथे आगमन झाल्यानंतर शिवछत्रपतींच्या पुतळ्याला तसेच तेथून गणेशवाडीत महात्मा फुले आणि त्यानंतर सीबीएसवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ते कामकाजाला सुरुवात करतील. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार असून, त्यानंतर राष्ट्रवादी भवनात गेल्यानंतर कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. दुसऱ्या दिवशी ते येवला या आपल्या मतदारसंघात जाणार असून, तेथेदेखील अभ्यागतांसाठी वेळ देणार आहेत. त्यानंतर मात्र ते शिर्डीला जाणार असून, साईबाबांचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर पुन्हा नाशिकमध्ये परतल्यानंतर शनिवारी कळवणला भेट देणार आहेत.