गोड खा! साखरेपाठोपाठ गुळही स्वस्त

सांगली : एका उद्योग समूहाने पाकिस्तानातून साखर आयात केल्यानंतर सध्या देशातील घाऊक बाजारात साखरेचे दर अडीच हजारावर खाली आले असताना याचा परिणाम सांगलीच्या गूळ बाजारावरही दिसू लागला आहे. गतवर्षांच्या तुलनेत यावर्षी गुळाच्या दरात क्विंटलमागे हजार ते अकराशे रुपयांची घसरण झाली आहे. येत्या काही दिवसात गुळाच्या दरात आणखी दोनशे रुपयांची घसरण होण्याची शक्यता सांगली चेंबर्सचे अध्यक्ष शरद शहा यांनी सांगितले आहे.

सांगलीच्या बाजारात प्रामुख्याने कर्नाटकच्या सीमाभागातून वर्षभर गूळ विक्रीसाठी येत असतो. गतवर्षी गुळाला ३ हजार ८०० ते ४ हजार १०० पर्यंत दर मिळाला होता. मात्र, यावर्षी कारखाने सुरू झाल्यानंतर साखरेच्या दरात घसरण सुरू होताच गुळाच्या दरावरही याचा परिणाम दिसू लागला आहे. गेल्या चार महिन्यांपासून गुळाच्या दरात मोठी घसरण सुरू असून बुधवारी सांगलीच्या बाजारात गुळाला किमान २ हजार ७०० ते ३ हजार १०० रुपये दर मिळाला.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा २०१७-१८ वर्षांचा गळीत हंगाम चालू झाला, तेव्हा प्रतिक्वटल साखरेचा दर ३८०० ते ३६०० रुपये होता. देशात साखरेचे उत्पादन मोठ्याप्रमाणात वाढल्यामुळे दराची घसरण चालू होती. कारखान्यांचे गळीत हंगाम संपताच प्रतिक्विंटल साखरेचे दर २८०० ते ३२०० रुपयांपर्यंत होते. मागील आठवडय़ातील दर २ हजार ६०० ते २ हजार ६५० रुपये असणारा दर साखर आयातीची घटना उघडकीस येताच २ हजार ४०० ते २ हजार ५५० रुपये क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. यातच पाकिस्तानातून साखर आयात केली जात असल्याच्या बातमीने साखर दराची घसरण सुरू झाली असून मंगळवारी सांगलीच्या बाजारात साखरेचे दर २ हजार ४०० ते २ हजार ५५० रुपयापर्यंत खाली घसरले. यामुळे पुन्हा गूळ दरात क्विंटलला दोनशे रुपयांपर्यंत घसरण होण्याची शक्यता असून याचा परिणाम गूळ उत्पादनावर होणार असल्याची माहिती शरद शहा यांनी दिली आहे.