अखेर मोहन भागवतांनी जाहीरपणे मोदींचे टोचले कान?

मुंबई : भारत प्रचंड मोठा देश आहे. या देशात सर्वच स्तरातील लोक राहतात. त्यामुळे संपूर्ण कॅशलेस अर्थव्यवस्थेची अंमलबजावणी करूच शकत नाही. फार तर लेस कॅश असे करता येईल. कोणताही देश कितीही प्रगत झाला तरी अर्थव्यवस्थेत काही प्रमाणात तरी चलन ठेवावेच लागेल, असा टोला लगावत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मोदी यांना घरचा आहेर दिला. विवेक समूह व गोखले आर्थिक संशोधन संस्थेच्या ‘सोशिओ-इकॉनॉमिक डायनॅमिक्स आॅफ इंडियन सोसायटी : अ हिस्टॉरिकल ओव्हरव्ह्यू’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई शेअर बाजाराच्या सभागृहात सोमवारी डॉ. भागवत यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी मोदींच्या धोरणाचा एकप्रकारे विरोध केला.

यावेळी ते म्हणाले की, एअर इंडियाकडील ३० शहरांचे लँडिंग परवाने विचारात घेतल्यास ही मोठी संपत्ती आहे. हजारो कुशल व अनुभवी कर्मचारी, विमाने, विमान उड्डाणाचे अधिकार अशा अनेक समृद्ध गोष्टींमुळे एअर इंडियाचे मोल खूप आहे. ही कंपनी तोटय़ात आहे कारण ती नीट चालवली जात नाही. त्यामुळे ती नीट चालवणाऱ्यांकडे सोपवा. आपल्या आकाशावर आपलेच प्रभुत्व हवे. ते बाहेरच्या लोकांना सोपवून चालणार नाही, असे भागवत यांनी नमूद करत भागवत यांनी येथे एअर इंडियाच्या विक्रीला विरोध दर्शविला. जर्मनीसारख्या प्रगत देशाचे आकाश विदेशी कंपन्यांसाठी फक्त २९ टक्के खुले आहे. एअर इंडिया ही भारताची ओळख आहे. त्याची विक्री विदेशी कंपनीला करून देशाच्या आकाशावरील प्रभुत्व विदेशींच्या हातात देणे योग्य नाही. असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी अन्य देशांचे अनुकरण करण्याची गरज नाही. साधन संपत्ती, स्रोतांचा मर्यादित उपभोग घ्यावा. आयातीवरील निर्भरता कमी करणे, पैसा व सुख उपभोगताना समाजातील कुठल्याच वर्गाचे नुकसान होऊ न देणे, दान अधिक करणे अशा स्वत:च्या स्वतंत्र आर्थिक मॉडेलची देशाला गरज आहे. साजमीन, जंगल, पाणी या नैसर्गिक संपत्तीचा नाश करणारा नव्हे तर त्यांची श्रीमंती वाढवणारा तो विकास असेल. आपली लोकसंख्या प्रचंड आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढली तर असंतोष निर्माण होईल हे लक्षात घेऊन रोजगार वाढवणारे उद्योग हवेत. ऊर्जेचा भरमसाट नव्हे आवश्यक तितकाच वापर करावा लागेल अशा तंत्रज्ञानाचा विकासासाठी वापर व्हावा, महागाई नियंत्रणात ठेवणारी व्यवस्था हवी, आयात कमी तर निर्यात जास्त हवी आणि त्याचबरोबर उद्योग-व्यापार-कृषी यांचा समन्वय या आर्थिक विकासाच्या आराखडय़ात असावा, असे भागवत यांनी स्पष्ट केले. अशारीतीने आर्थिक विकास साधत भारताने जगाला मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षाही भागवत यांनी व्यक्त केली.