आदिवासी चित्रकलेचा श्रेष्ठ उपासक-प्रसारक हरपला -मुख्यमंत्री

मुंबई: वारली या आदिवासी चित्रकलेला वैभव प्राप्त करुन देणारे ख्यातनाम कलाकार पद्मश्री जीवा सोमा म्हसे यांच्या निधनाने आदिवासी समुहाची वैशिष्ट्यपूर्ण कला-संस्कृती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविणारा उपासक-प्रसारक आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, पालघर जिल्ह्यासारख्या दुर्गम भागातील वारली चित्रकला सातासमुद्रापार पोहोचविणाऱ्या श्री. म्हसे यांच्या धडपडीमुळे वैशिष्ट्यपूर्ण आदिवासी संस्कृतीचे विविध पदर उलगडले. आज वारली चित्रकला ख्यातीप्राप्त झाली असून तिच्या माध्यमातून आदिवासी समुहाचा श्रेष्ठ असा कलाविष्कार समर्थपणे व्यक्त होत आहे. त्यामागे श्री. म्हसे कुटुंबियांचे मोलाचे योगदान आहे. श्री. म्हसे यांच्या कार्याची दखल पद्मश्रीसारख्या नागरी पुरस्काराने देशाने घेतली असून अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांचा झालेला गौरव त्यांच्या कलेची महत्ता दर्शविणारा आहे.