दोन एसटीचा भीषण अपघात; एक महिला ठार, २ जखमी

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील लोंघे येथे आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास दोन एस.टी. बसेसची धडक झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एक ठार झाला असून २० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. बेबी बाळू मुल्लानी (वय ६२, रा. तिसंगी, ता. गगनबावडा) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तर जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

विजयदुर्ग-पुणे ही एस. टी. गगनबावड्याहून कोल्हापूरकडे येत होती. तर, कोल्हापूर-कोदे ही एस.टी. साळवंनच्या दिशेने निघाली होती. लोंघे येथे या दोन्ही एस.टीं.ची जोरदार समोरासमोर धडक झाली. यात एकाचा मृत्यू झाला तर २० हून अधिक प्रवासी जखमी झाले. ही धडक इतकी भीषण होती की, या दोन्ही बसचा समोरील भाग एकमेंकात घुसला होता.

अपघातातील जखमींना अक्षरशः बसच्या पत्रा कापून बाहेर काढण्यात आले. या अपघातापरिणामी कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. जखमी झालेल्या प्रवाशांना १०८ रुग्णवाहिकेतून सीपीआर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.