राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत सुमारे 91 टक्के बालकांची आरोग्य तपासणी पूर्ण

मुंबई : राज्यात राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत 98.50 टक्के अंगणवाड्यांची तर त्यातील 90.47 टक्के बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे. वर्षातून दोन सत्रांमध्ये ही तपासणी केली जाते.

राज्यामध्ये राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांची तपासणी केली जाते. त्यासाठी 993 पथके कार्यरत आहेत. त्यात एक पुरुष व एक महिला वैद्यकीय अधिकारी, एक परिचारिका आणि औषधनिर्माण अधिकाऱ्यांचा समावेश असतो.

माहे एप्रिल 2017 ते मार्च 2018 पर्यंत एकूण एक लाख 3 हजार 344 अंगणवाड्या व त्यातील 72 लाख 74 हजार 543 बालकांचे तपासणी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या सत्रात माहे एप्रिल 2017 ते सप्टेंबर 2017 या कालावधीत 98 हजार 029 (94.86 टक्के) अंगणवाड्यांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये 62 लाख 20 हजार 498 (85.51 टक्के) बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. पैकी चार लाख 63 हजार 117 किरकोळ आजारी असलेल्या बालकांना औषधोपचार करण्यात आले आहे.

दुसऱ्या सत्रात माहे ऑक्टोबर 2017 ते मार्च 2018 या कालावधीत एक लाख एक हजार 790 (98.50 टक्के) अंगणवाड्यांची तपासणी करण्यात आली असून 66 लाख 40 हजार 800 (90.47 टक्के) बालकांची तपासणी करण्यात आली आहे.

तपासणीदरम्यान आढळून आलेल्या आजारी बालकांवर औषधोपचार केले जातात. गंभीर स्वरुपाच्या आजारी बालकांना पुढील उपचाराकरिता तज्ज्ञांकडे संदर्भित केले जाते. आवश्यकता भासल्यास शस्त्रक्रिया केली जाते. हे सर्व उपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात.