नक्षलवाद्यांसाठी पैसा गोळा करणाऱ्या अभय नायकला अटक

- १५ देशांशी संपर्क !

दिल्ली : भारतातील नक्षलवादी कारवायांसाठी १५ देशांमधून पैसा गोळा केल्याचा आरोप असलेला सीपीआयचा प्रतिनिधी अभय नायक याला छत्तीसगढ पोलिसांनी दिल्ली येथून ताब्यात घेतले आहे. उल्लेखनीय म्हणजे त्याच्याकडून २०१७ मध्ये आयईडी स्फोटके आणि इतर बंदी असलेली पुस्तके जप्त करण्यात आली होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, नायक आधुनिक तंत्रज्ञानाने आपली ओळख गुप्त ठेवण्यासाठी तसेच नक्षलवादी कारवायांसाठी तरुणांना आकर्षित करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करत होता. नायक दक्षिण आशियातील माओवाद्यांच्या सहकार्य समितीमध्ये सहभागी होता. शहरी भागात माओवाद्यांचे जाळे उभारण्यात त्याचा हात होता.

पोलिसांनी मे २०१७ मध्ये त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीसही बजावली होती. त्यानंतर १ जून रोजी त्याला दिल्ली विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले, असे बस्तरचे पोलिस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा यांनी सांगितले आहे.

अभय देवदास नायक उर्फ लोड्डा हा मुळचा बंगळूरूचा रहिवासी असून तो गेल्या एक ते दीड वर्षांपासून बस्तर पोलिसांच्या आणि राज्य गुप्तचर विभागाच्या रडारवर होता. नक्षलविरोधी विशेष पोलिस महानिरिक्षक डी. एम. अवस्थी म्हणाले, तो शहरी नक्षल विंग पथकाचा सदस्य होता, तसेच नक्षली विचार पसरवण्यात त्याचा हात होता.

पोलिसांनी सांगितले की, नायक अनेक माओवाद्यांच्या समर्थकांसह रोना विल्सन आणि प्रा. शोमा सेन यांच्या संपर्कात होता. या दोघांसह पाच जणांना पुणे पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले असून त्यांचा १ जानेवारीला पुण्यातील कोरेगाव भीमा हिंसाचारात सहभाग असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

दरम्यान, नायकने २०१७ मध्ये बेल्जिअम, फ्रान्स, युके, मेक्सिको, इक्वेडॉर, बोलिविया, कंबोडिया, सिंगापूर, इंडोनेशिया, रशिया आणि नेपाळ या १५ देशांना भेटी दिल्या आहेत. या देशांच्या भेटींदरम्यान त्यांने माओवाद्यांसाठी पाठिंबा आणि पैसा जमवण्याचे काम केले आहे. दरम्यान, त्याने बस्तरला दोन वेळेस भेट दिली आहे.

मात्र, नायकने माध्यमांशी बोलतांना सर्व आरोप फेटाळले असून मी मुक्त पत्रकार आहे व माओवाद्यांबद्दल फक्त लिहीतो, असे म्हटले आहे.

त्याचे वडील देवदास दामोदर नायक यांनीही मुलावरील आरोप चुकीचे असून तो निरपराध असल्याचे इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले.