लोकशाही अस्तित्वातच नाही तर हत्या कशी होणार ? – संजय राऊत

मुंबई : देशात लोकशाही अतित्वात नाही तर सर्वत्र तिची हत्या केल्याची टीका का होत आहे ? असा सवाल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी बहुमत सिद्ध करणे त्यांना कठीण जाणार आहे. ज्यांची संख्या जास्त त्यांना राज्यपालांनी सरकार बनवण्याचे निमंत्रण दिले आहे. लोकशाहीची हत्या झाल्याची टीका विरोधी पक्ष करत आहेत. पण जेव्हा देशात लोकशाहीच अस्तित्वात नाही तर तिची हत्या कशी होईल, अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली .

राज्यपाल वजूभाई वाला यांनी भाजपाला सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण दिल्याने काँग्रेस-जेडीएस आघाडीने या निर्णयावर टीका केली. त्यांच्या निर्णयाविरोधात काँग्रेस-जेडीएस बेंगळुरूत आंदोलन करत आहेत. भाजपाने लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मध्यरात्री भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांचा शपथविधी रोखण्यास नकार दिला. त्यानंतर आज सकाळी येडियुरप्पांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपालांनी काँग्रेस-जेडीएस ऐवजी भाजपाला निमंत्रण दिल्याने या निर्णयावर देशभरातून टीका होताना दिसते. त्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली.