आधारामुळे तब्बल ९० हजार कोटींची बचत

नवी दिल्ली : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) चे चेअरमन जे. सत्यनारायण यांनी बुधवारी झालेल्या एका आंतरराष्ट्रीय संमेलनात आधार कार्डच्या माध्यमातून बँकांमध्ये अनुदान जमा करण्याच्या सुविधेमुळे सरकारचे ९० हजार कोटी रुपये वाचले आहेत, अशी माहिती दिली. भारताने आधारचा वापर केल्यामुळे ९० हजार कोटींची बचत केल्याचा दावा त्यांनी केला. ‘डिजिटल ओळख’ विषयावर एका संमेलनात त्यांनी आधार कार्डच्या वापराने झालेल्या फायद्यांची माहिती दिली.

भारत देशात दररोज सरासरी तीन कोटी लोक आधार कार्डचा वापर करतात. यामध्ये प्रामुख्याने स्वस्त धान्य, निवृत्त वेतन, ग्रामीण रोजगार यासह विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी सर्वाधिक वापर होत असल्याचे जे. सत्यनारायण यांनी सांगितले. इंडियन स्कूल ऑफ हैद्राबाद येथे झालेल्या तीन दिवसीय संमेलनात आधारावर विशेष लक्ष देण्यात आले. सत्यनारायण म्हणाले की, पेट्रोलियम, घरगुती गॅस, अन्नधान्य वितरण, ग्रामीण विकास यांसह इतर विभागांमध्ये मिळून ९० हजार कोटी रुपये वाचले असून सरकार नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रगती करत आहे.