एल्गार परिषद आणि नक्षलवाद्यांच्या संबंधांची कसून चौकशी

पुणे : डिसेम्बर महिन्यात शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेत उपस्थितांपैकी कोणाकोणाचा नक्षलवाद्यांशी सम्पर्क होता याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. याबाबत परिषदेच्या आयोजकांवर लक्ष्य केंद्रीत करण्यात आले आहे.

कोरेगाव- भीमा युद्धाच्या २०० व्या वर्धापनदिनानिमित्त ही परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, १ जानेवारीला भीमा-कोरेगाव येथे हिंसक जातीय दंगल उसळली होती. या दंगलीत कोरेगाव- भीमा जवळ सणसवाडी येथे झालेल्या हिंसाचारात एका युवकाचा मृत्यू झाला. नंतर दलितांची राज्यव्यापी हिंसक निदर्शने झाली व त्यात हिंसक जमावाने करोडो रुपयांचे नुकसान केले.

या संदर्भात आरोप आहे की परिषदेत कबीर कला मंचच्या नेत्यांनी प्रक्षोभक भाषणं केली; त्यामुळे भावना भडकून दंगल झाली. याबाबत कबीर कला मंचविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

सहायक पोलीस आयुक्त पुणे शिवाजी पवार यांनी या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार असलेल्या वेगवेगळ्या संघटनांच्या कार्यकर्त्यांची चौकशी केली. त्यांचे बयान नोंदवून घेतले.

परिषदेच्या आयोजकांपैकी एक मूलनिवासी मुस्लिम मंचचे अंजुम इनामदार यांनी सांगितले की भारिप – बहुजन संघाचे नगरपरिषदेचे अध्यक्ष एम. एन. कांबळे, भीम सेनेचे दत्ता पोळ (आयोजक), आकाश साबळे, अशोक कांबळे , के. के. एम. ज्योती जगताप, रमेश गायचोर आणि कबीर कला मंचचे सागर गोरखे यांनाही आज पोलिसांनी समन्स बजावले आहे.

एल्गार परिषदेसाठी पैसा कुठून आला याचीही पोलिसांनी चौकशी केली, असे चौकशी झालेल्या एका कार्यकर्त्याने सांगितले.

या परिषदेच्या संदर्भात नक्षलवाद्यांशी सम्पर्क असण्याच्या आरोपात पुणे पोलिसांनी मुंबईचे दलित कार्यकर्ते सुधीर ढवळे, नागपूरचे वकील सुरेंद्र गडलिंग, कार्यकर्ते महेश राऊत आणि प्राध्यापक शोमा सेन आणि दिल्लीचे रोना विल्सन यांना अटक केली होती.

सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम म्हणाले विश्रामबाग पोलीस ठाण्यात केस दाखल असलेल्या वेगवेगळ्या संघटनांच्या कार्यकर्त्यांची आम्ही राज्य पातळीवर चौकशी केली असता त्यांचे नक्षल्यांशी जवळचे सम्बन्ध असल्याची माहिती हाती लागली.

परिषदेस गुजरातचे आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवानी, जेएनयू विद्यार्थी नेता उमर खालिद, रोहित वेमुलाची आई राधिका वेमुला, भारिप- बहुजन महासंघचे अध्यक्ष प्रकाश अंबेडकर उपस्थित होते. पोलिस आंबेडकरांच्या भूमिकेचीही चौकशी करत आहेत कारण त्यांचा जवळचा नातेवाईक भूमिगत नक्षलवादी कार्यकर्ता आहे. सुधीर ढवळे, सागर गोरखे, हर्षली पोतदार, रमेश गेचोर, दीपक डेंगले आणि ज्योती जगताप यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.