मंत्री अनुप्रिया पटेल यांना अश्लील इशारे करणाऱ्यांना अटक

मिर्झापूर : केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांच्यासोबत असभ्य वर्तन करणाऱ्या तीन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवार रात्रीची आहे.

अनुप्रिया पटेल त्यांचा मतदार संघ मिर्झापूर येथून एक कार्यक्रम आटोपून ताफ्यासोबत वाराणसीला परतत होत्या. रात्री नऊच्या सुमारास शास्त्री पुलावरुन जात असताना मागून सुसाट आलेल्या फोर्ड कारने त्यांच्या कारला ओव्हरटेक करण्याचा प्रय़त्न केला. पण ताफ्यातील इतर वाहनांनी त्या गाडीला पुढे जाण्यापासून रोखले. त्यानंतर फोर्ड गाडीत असलेल्या तीन जणांनी गाडीतूनच अनुपमा यांच्याकडे पाहून अश्लिल इशारे आणि अभद्र टिप्पणी करणे सुरू केले.

अनुप्रिया पटेल यांच्यासोबत त्यांचे पती अपना दल(एस)चे राष्ट्रीय अध्यक्ष आशीष पटेल हे देखील होते. सुरूवातीला पटेल आणि त्यांच्या पतीने याकडे दुर्लक्ष केलं. पण त्या तिघांकडून अश्लिल इशारे सुरूच होते, अखेर चिडलेल्या आशीष पटेल यांनी वाराणसीच्या पोलिसांना याबाबत माहिती दिली, पोलिसांनी वायरलेसद्वारे सूचना देऊन सुसाट जाणाऱ्या फोर्डा गाडीला अडवलं आणि तीन तरुणांना ताब्यात घेतलं आहे.