बहुमत सिद्ध करण्यासाठी इतरांनीही दिला होता भरपूर वेळ

- वजुभाईंवर होते आहे टीका

नवी दिल्ली : कर्नाटकामध्ये भाजपाला सर्वात जास्त जागा मिळवणारा पक्ष म्हणून राज्यपाल वजूभाई वाला यांनी सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले व बहुमत सिद्ध करण्यासाठी संकेतांनुसार १५ दिवसांची मुदत दिली. त्यांच्या या निर्णयावर सर्वत्र टीका होत आहे.

वजूभाई वाला यांनी भाजपाला बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवस दिल्याने घोडेबाजार होईल, आमदार विकत घेण्याची संधी भाजपाला मिळेल असा आरोप होतो आहे. पण, बहुमत सिद्ध करण्यासाठी जास्त वेळ देणारे वजूभाई वाला हे काही पहिले व्यक्ती नाहीत. स्वतंत्र भारताचा इतिहास पाहाता ज्या ज्यावेळेस त्रिशंकू सभागृहाची किंवा आघाडी करुन सत्ता स्थापन करण्याची वेळ आली तेव्हा केंद्रामध्ये राष्ट्रपती व घटकराज्यांत राज्यपालांनी सत्तेचा दावा करणात-ऱ्या पक्षांना असाच वेळ दिला आहे.

१९९६ साली राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी दिला होता. मात्र अटलबिहारी वाजपेयी यांनी १३ व्या दिवशीच विश्वासमत घेतले, त्यांना बहुमत सिद्ध करता आले नाही. १९९८ साली वाजपेयी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १० दिवस मिळाले होते. वाजपेयी यांनी ९ व्या दिवशीच लोकसभेत बहुमत सिद्ध केले.

त्यांच्यापूर्वी व्ही. पी. सिंग आणि पी. व्ही.नरसिंह राव यांच्या सरकारांना तत्कालीन राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांनी चक्क १ महिन्याची मुदत दिली होती. व्ही. पी. सिंग सरकारने डावे आणि भाजपाच्या पाठिंब्यावर बहुमत सिद्ध केले होते. गोव्यामध्येही राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी दिला होता. मणिपूरमध्ये राज्यपाल नजमा हेप्तुल्ला यांनी ९ दिवसांचा अवधी दिला होता, हे उल्लेखनीय.