पाण्याच्या शोधात निघालेला बिबट्या विहीरीत

औरंगाबाद : अजिंठ्याच्या डोंगरपायथ्याशी वसलेल्या सोयगाव शिवारातील सर्वच पाणवठे महिनाभरापासून कोरडेठाक झाल्याने सोयगाव तालुक्यातील जरंडी येथे पाण्याच्या शोधात आलेल्या बिबट्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो विहिरीत पडल्याची घटना आज दुपारी घडली. वन विभागाच्या पथकाने शिताफीने त्याला विहिरीबाहेर काढताच जखमी बिबट्याने वनक्षेत्रात धूम ठोकली.

जरंडीच्या काटीखोरा शिवारातून पिण्याच्या पाण्यासाठी भ्रमंती करत आलेल्या बिबट्याला शेतकरी ज्ञानेश्वर तोताराम मोरे यांच्या शेतातील पाण्याने डबडबलेली विहिर दिसताच त्याने धाव घेतली. तोल गेल्याने बिबट्या विहिरीत पडला. यानंतर डरकाळ्या ऐकून शेतकरी ज्ञानेश्वर मोरे यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना बिबट्या दिसला. त्यांनी परिसरातील शेतक-यांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी वनविभागाचे पथकास पाचारण करण्यात आले.