अहमदाबादच्या सरकारी रुग्णालयात गेला २४ तासात ९ नवजात बालकांचा जीव

अहमदाबाद : येथील सरकारी रुग्णालयात गेल्या २४ तासांत ९ नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मरण पावलेल्या सर्व मुलांचे वजन कमी असल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. सदर घटनेची माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्याने दिली.

या ९ नवजात बालकांपैकी पाच नवजात बालकांना बाहेरच्या रुग्णालयातून अहमदाबाद येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं होतं. तर इतर चार बालके येथेच जन्मली होती. मुलं शारीरिकदृष्ट्या खूप अशक्त होती. तसेच त्यांना भयंकर आजारानं पछाडलं होतं, अशी माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. दुसरीकडे आता या मुद्द्यावरून गुजरातमध्ये राजकारणाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसनं गुजरात सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारनं एकतर या घटनेला डॉक्टरांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचं मान्य करावं, अन्यथा मुलांच्या आई कुपोषित होत्या का ते सांगावं, असं ट्विट करत काँग्रेस नेते शक्तिसिंह गोहिल यांनी गुजरात सरकारला लक्ष्य केलं आहे.

दुसरीकडे आरोग्य आयुक्त डॉ. जयंती रवी यांनी बालकांच्या मृत्यूला दुजोरा देत याबाबत माहिती घेत असल्याचे सांगितले. सुरूवातीच्या माहितीनुसार काही बालकांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामध्ये काही बालकांचा मृत्यू हा सेप्टिसीमियामुळे झाला. बालकांच्या मृत्यूचे हे मोठे प्रकरण असल्याचे त्या म्हणाल्या.

तसेच, रूग्णालयाच्या बाल चिकित्सा विभागच्या सहाय्यक प्रा. डॉ. अनुया चौहान म्हणाल्या की, गेल्या काही वर्षांत एका दिवसांत इतक्या नवजात बालकांच्या मृत्यूचे हे पहिलेच प्रकरण आहे. मृतांत चार मुलं आणि पाच मुलींचा समावेश होता. यातील पाच बालकांचे वजन खूप कमी होते. यांचे वजन ७०० ग्रॅम ते एक किलोग्रॅम इतके होते. तर इतर चार बालकांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झाला आहे. यादरम्यान, या घटनेनंतर रुग्णालयात कोणत्याही प्रकारचे विरोध प्रदर्शन व्हायला नको, त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे.