२०१९ च्या निवडणुकीत सपा- बसपा सोबत

लखनौ : उत्तर प्रदेशात लोकसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजपक्षाने एकत्र येत भाजपाचा पराभव केला होता. त्यानंतर सपाचे नेते अखिलेश यादव यांनी ही युती २०१९ च्या निवडणुकांमध्येही कायम राहील अशी घोषणा केली होती. मात्र राज्यसभेच्या निवडणुकीदरम्यान सपाच्या आमदारांनी बंडखोरी केल्याने बहुजन समाज पक्षाला राज्यसभेच्या जागेला मुकावे लागले होते. त्यानंतर हि युती कायम राहणार का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, पण अखिलेश यादव यांनी बसपाबरोबर सपाची युती निश्चित असून दोन्ही पक्ष एकत्र येत पुढच्या लोकसभेच्या निवडणुका लढतील असं म्हटले आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.

या मुलाखतीच्या सुरुवातीलाच अखिलेश यांनी सांगितले की त्यांनी मायावती यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. दिल्लीमध्ये एकाच टेबलवर बसून आम्ही दोघांनी एकत्र जेवण केलं, यावेळी आमच्यात बऱ्याच मुद्दांवर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेची माहिती देणं योग्य नाही कारण भाजप ही अत्यंत धूर्त पक्ष आहे असं अखिलेश म्हणाले. आत्तापर्यंत या दोन्ही पक्षामध्ये विळ्या भोपळ्याचं नातं होतं. जुन्या गोष्टी विसरत नवी सुरुवात करणं गरजेचं आहे असं अखिलेश यांनी म्हटलं आहे.