आज होणार मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर !

नवी दिल्ली : हवामान विभाग यंदाच्या मान्सूनबद्दलचा अंदाज आज जाहीर करणार आहे. यंदा उत्तम मान्सूनची शक्यता अधिक असल्याचाअंदाज अगोदरच तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा पुरेसा पाऊस पडणार का, या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळणार आहे. मान्सून जून महिन्यात केरळला धडकण्याची आणि सप्टेंबपर्यंत मान्सूनचा पाऊस सुरू राहील, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सोमवारी हवामान विभाग दक्षिण-पश्चिम मान्सूनसाठी दीर्घ कक्षेचा अनुमान प्रसिद्ध करणार आहे. एप्रिल आणि जूनमध्ये दोन टप्प्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला जाणार आहे. हवामान विभागाचे महासंचालक के. जे. रमेश सोमवारी दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषदेत ही माहिती देणार आहेत. खासगी संस्था स्कायमेटने मान्सूनचा अनुमान अगोदरच वर्तविला आहे.

स्कायमेटनुसार यंदा मान्सून सरासरीत राहण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सूनमुळे १०० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. संस्थेने दुष्काळ पडणार नसल्याचा दावा करत, शेती तसेच अर्थव्यवस्थेसाठी यंदाचा मान्सून चांगला राहणार असल्याचे अनुमान व्यक्त केले आहे. उत्तर भारतात वाराणसी, गोरखपूर, लखनौ, शिमला, मनाली, डेहरादून, श्रीनगर समवेत पूर्व उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो.