डीएसकेविरोधात २ हजार ४३ कोटींचा दोषारोपपत्र दाखल

पुणे : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांच्याविरुद्ध गुरुवारी आर्थिक गुन्हे शाखेने ३६ हजार ८७५ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. यादरम्यान, डी. एस. कुलकर्णी यांच्या विरोधात दाखल केलेल्‍या दोषारोपपत्रात त्‍यांनी २ हजार ४३ कोटींचा घोटाळा केला असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी दिल्लीतून डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती यांना अटक केली होती. याप्रकरणात पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात आरोपपत्र सादर केले. पोलिसांनी हे दोषारोपपत्र चार गाड्यांमधून आणले असून, ते अपर सत्र न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले.

दरम्‍यान, याप्रकरणी फायनान्स विभाग प्रमुख विनयकुमार बडगंडी यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी पोलिसांनी डीएसकेंच्या जावयासह दोघांना अटक केली होती. केदार वांजपे, सई वांजपे आणि वरिष्ठ अधिकारी धनंजय पाचपोर अशी या तिघांची नावे होती. केदार वांजपे हे कुलकर्णी यांच्या भावाचे जावई असून कुलकर्णी यांनी सईच्या नावाने जमीन खरेदी केली होती.