वाराणसीमध्ये पुलाचा भाग कोसळल्याने १२ जणांचा मृत्यू

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ असलेल्या वाराणसीमध्ये केंट रेल्वे स्टेशनजवळील पुलाचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली 50 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचावपथक घटनास्थळी पोहचले आहे. जखमींना जवळील रुग्णलयात पोहचवण्याचे काम सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केंट रेल्वे स्टेशनजवळील पुलाचे बांधकाम सुरु होते. त्याचवेळी अचानक पुलाचा पिलर कोसळला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे लोक घाबरले आणि जिवाच्या आकांताने इकडेतिकडे पळू लागले. आत्तापर्यंत कामगारांसह काही जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. दरम्यान, काही लोक अडकले असल्याची भीती वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान उपस्थित असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.