गोव्यात १०० किलो कॅटामाइनचा साठा जप्त; परदेशी नागरिकांना अटक

पणजी : केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने पिसुर्ले औद्योगिक वसाहतीतील विजय इंडस्ट्रीज या बंद आस्थापनावर, तसेच पर्रा-हडफडे येथील घरावर छापा टाकून तब्बल १०० किलो कॅटामाइन या अमलीपदार्थाचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी पथकाने तीन विदेशी नागरिकांसह एका पंजाबी युवकाला आपल्या ताब्यात घेतले आहे. मात्र मुख्य सूत्रधार कळंगुट येथील हॉटेलातून पसार होण्यात यशस्वी झाला.

कॅटामाईन या पदार्थाचा रेव्हपार्ट्यांमध्ये ड्रग्स म्हणून मोठ्या प्राणावर वापर होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. अत्यंत गुप्तता राखून केवळ गोवा नाही तर संपूर्ण देशभर ही कारवाई करण्यात आली आहे. गोव्यासह देशभरात इतर ठिकाणी टाकलेल्या छाप्यात मिळून ३०८ किलो अमलीपदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये गुजरातचाही समावेश असल्याचं समजतंय. देशभर टाकण्यात आलेल्या छाप्यात एकूण १० मुख्य संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर एनडीपीएस कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पणजीपासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या सत्तारी तालुक्यातील पिसुरलेम इंडस्ट्रियल इस्टेटमधील एका कारखान्यात सोमवारी रात्री महसूल गुप्तचर विभागाने छापेमारी केली. काल पहाटेपर्यंत ही छापेमारी सुरू होती अशी माहिती समोर आली आहे. या कारखान्याला स्टील उत्पादनाचा परवाना मिळाला होता, मात्र याठिकाणी अवैध प्रकारे कॅटामाइन बनवलं जात होतं. कारखान्याच्या मालकाचा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.