भीमा कोरेगाव ही तर सुरुवात : राज ठाकरे

रत्नागिरी: देशात यापुढेही धार्मिक आणि जातीय दंगली घडविल्या जाणार असून भीमा कोरेगाव ही त्याची सुरुवात असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधिशांनी घेतलेली पत्रपरिषद म्हणजे देश अराजकतेकडे जाण्यास सुरुवात झाली असल्याचे ते म्हणाले.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे कोकणाच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकार परिषद घेऊन भीमा कोरेगाव प्रकरणावर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. देशात यापुढे धार्मिक आणि जातीय दंगली घडवल्या जातील आणि भिमा कोरेगाव ही त्याची सुरुवात आहे असे राज ठाकरे म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशानाच जर त्यांच्यावर झालेला अन्याय पत्रकारांसमोर आणावासा वाटत असेल तर सामान्य जनतेला न्याय मिळेल असे आता वाटत नाही असे राज ठाकरे म्हणाले.

भाजपाला विजय हा एव्हीएम मधल्या फेरफारानेच मिळत असून. निवडणूक आयोगही सत्तेला बांधील झाल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला तसेच या देशात लोकशाही नांदत नाही हे वारंवार सिद्ध होत असल्याचे ते म्हणाले.