भारत vs द. आफ्रिका ५ वा ODI : S. A. २१ षटके १०२/३, IND २७४/७

पोर्ट एलिझाबेथ : रोहित शर्माच्या दमदार ११५ धावांनंतरही भारतीय संघाला ५ व्या एकदिवसीय सामन्यात द. आफ्रिकेसमोर मोठे आव्हान उभारण्यात अपयश आले आहे. भारताने आफ्रिकेसमोर २७५ धावांचे लक्ष्य ठेवले असून यजमानांनी २१ षटकांमध्ये ३ गड्यांच्या मोबदल्यात १०२ धावा केल्या आहेत. दरम्यान रोहितने जुन्या लयीत खेळताना आज आपले सतरावे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले.

तत्पूर्वी आज नाणेफेक जिंकून आफ्रिकेने भारताला फलंदाजीस पाचारण केले. सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली. दरम्यान, रबाडाने धवनची विकेट काढत भारताला पहिला धक्का दिला. धवनने २३ चेंडूत ३४ धावा तडकावल्या. त्यानंतर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांनी भारताचा डाव सावरला.

बऱ्याच दिवसांनी फॉर्ममध्ये परतलेल्या रोहितने आज दमदार खेळाचे प्रदर्शन केले. रोहित आणि विराटने दुसऱ्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी करत भारताला दीडशेपार पोहोचवले. मात्र याच वेळी रोहितच्या चुकीमुळे विराट कोहली (३६) धावचीत झाला. त्यानंतर रोहितने धाव घेताना पुन्हा एकदा चूक केल्याने अजिंक्य रहाणेला माघारी परतावे लागले. भारताच्या एकूण सात बळींपैकी ४ फलंदाजांना एडिंगेने तर एकाला १ कागिसो रबाडाने पॅव्हेलियनमध्ये धाडले. तर दोन फलंदाज धावबाद झाले. ६ सामन्यांच्या या मालिकेत भारत ३-१ ने आघाडीवर आहे.